ऐतवडेचा वॉर्ड क्रमांक एक ‘किंगमेकर’
- पंचायत समितीत प्रकाश माळी यांच्या विजयात महत्वाचा वाटा
- १५५ मतांचे वॉर्डातून लीड
सांगली ! प्रदीप लोखंडे
नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या मध्ये ऐतवडे बुद्रुक पंचायत समितीमधून प्रकाश माळी विजयी झाले. त्यांच्या विजयात ऐतवडे बुद्रुक गावातील वॉर्ड क्रमांक एकने ‘किंगमेकर’ची भूमिका बजावत विजयात महत्वाचा वाटा उचलला आहे. मोठा मतदार असलेल्या मागासवर्गीय बांधवांसह जैन समाज बांधव आणि नाभिक समाजाच्या बांधवांनी भरघोस मते दिल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. या गावासह ठाणापुडे, शेखरवाडी आणि डोंगरवाडी गावातूनही मताधिक्क्य मिळाल्याने माळी यांचा विजय सोपा झाल्याचे सांगितले जात आहे.
कामेरी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ऐतवडे बुद्रुक पंचायत समिती गणात ऐतवडे बुद्रुक, ठाणापुडे, शेखरवाडी, डोंगरवाडी, जक्राईवाडी, कार्वे, ढगेवाडी आणि करंजवडे गावाचा समावेश होतो. या गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून प्रकाश माळी निवडणुकीच्या रिंगणात होते. तर भाजपकडून धनंजय शेटे होते. माळी यांचे गावात स्वस्त धान्य दुकान असल्याने त्यांचा थेट नागरिकांशी सुरुवातीपासूनच संपर्क होता. तसेच गणेशोत्सव, विविध सामाजिक कार्यक्रमात ते सक्रिय होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे पारडे जड होते.
प्रकाश माली यांच्या विजयात ऐतवडे बुद्रुक, ठाणापुडे, शेखरवाडी आणि डोंगरवाडी गावाने मताधिक्क्य देत महत्वाची भूमिका बजावली. या मध्ये मोठे गाव असलेल्या ऐतवडे बुद्रुक मध्ये अंदाजे १६५ चे मताधिक्य आहे. या मध्ये मागासवर्गीय समाज बांधवांचे मतदार अधिक असलेल्या वॉर्ड क्रमांक एकने किंगमेकरची भूमिका निभावली आहे. केवळ या एका वॉर्ड मधून प्रकाश माली यांना तब्बल १५५ मतांचे मताधिक्क्य आहे. तर उर्वरित गावातील चार वॉर्ड मध्ये केवळ दहा ते वीस मतांचेच मताधिक्क्य आहे. वॉर्ड क्रमांक एक मध्ये एकूण अंदाजे ९४७ मतदार आहेत. या पैकी अंदाजे जैन समाजा बांधवांचे १५०, नाभिक समाज बांधवांचे ३५ मतदार आहेत. तर साडे पाचशे ते पावणे सहाशे पर्यंत बौद्ध, मातंग आणि चर्मकार समाज बांधवांचे मतदान असल्याचे सांगितले जाते. या वॉर्डने भरघोस मताधिक्क्य दिल्याने प्रकाश माळी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसते.
————————————–
बातमीसाठी संपर्क : ७३५०२६६९६७

