अवैध दारूची सर्रास विक्री ; पोलिसांना जाग कधी येणार ?
- आठ जणांच्या मृत्यूच्या घटनेवर लोकप्रतिनिधींचा संताप
पिंपरी ! राईट अँगल
पिंपरी चिंचवड परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा घटनांकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड पोलीस कधी जागे होणार ? असा संतप्त सवाल उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
पुणे ५ आणि पिंपरी चिंचवडमधे विषारी दारुमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण गंभीर आहेत. दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील काळेपडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही विषारी स्पिरिटयुक्त दारु योगेश वानखेडे याने बनवली होती. ती दारु पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमधे मिळून विकली गेली. दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील ज्यांनी दारु प्यायली ते तोंडाला फेस येऊन मृत्युमुखी पडले, असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

