ताज्या घडामोडी

विधानपरिषद : सुनील टिंगरेंच्या निवासस्थानी विक्रम काकडे दाखल ।

टिंगरेंची समजूत काढण्यात काकडेंना यश ; उद्या अर्ज मागे घेणार असल्याचे माजी आमदार टिंगरे यांची माहिती 

पिंपरी | प्रदीप लोखंडे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार सुनील टिंगरे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे स्पष्ट करत टिंगरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

बुधवारी (३ जून) रात्री राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांनी सुनील टिंगरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नगरसेवक सुहास टिंगरे, रवी टिंगरे यांच्यासह पक्षाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील एकजूट कायम ठेवण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आल्याची चर्चा आहे.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आपण अर्ज दाखल केला होता. मात्र आता पक्षाने अधिकृत उमेदवार निश्चित केला असून पक्ष नेतृत्वाचा आदेश सर्वोच्च असल्याने आपण अर्ज मागे घेणार असल्याचे सुनील टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. “उमेदवार निश्चित होईपर्यंत मी अर्ज भरला होता. आता उद्या अर्ज मागे घेणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पक्ष नेतृत्वानेही टिंगरे यांच्याशी संवाद साधत त्यांना पक्षात योग्य सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल, तसेच त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नसल्याचा विश्वास दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरुवातीला दिसून आलेली नाराजी मावळल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र टिंगरे यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केल्याने पक्षातील अंतर्गत मतभेदांवर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद एकवटण्यासाठी वरिष्ठ नेतृत्व प्रयत्नशील असून काकडे आणि टिंगरे यांच्या भेटीला त्याच दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.