प्रभाग दोनसह वडगावशेरीतील दूषित पाणीपुरवठ्यावर महापालिका सतर्क
- नगरसेविका नंदिनी धेंडे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या इशाऱ्यानंतर केली पाहणी
पुणे ! पीपल बाईट बाईट
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनसह वडगावशेरी मतदारसंघात गेल्या पाच दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भामा आसखेड प्रकल्पातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याला दुर्गंधी येत असून अनेक भागांमध्ये जुलाब, उलट्या आणि पोटदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बाबत नगरसेविका नंदिनी धेंडे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा करत ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलली आहेत.
नागपूर चाळ, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, त्रिदलनगर, टिंगरेनगर, चव्हाण चाळ, कस्तुरबानगर, जेल रोड परिसरासह वडगावशेरी मतदारसंघातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याचा फटका बसला आहे. सुमारे पाच लाख नागरिक या समस्येमुळे त्रस्त झाले असून अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका नंदिनी धेंडे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह प्रभाग दोनमधील नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भामा आसखेड धरण तसेच जलशुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक तपासणीत काही तांत्रिक बाबी निदर्शनास आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाणी नमुन्यांची तपासणी सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळूनच वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

