ताज्या घडामोडी

ऐन उन्हाळ्यात महावितरणचा गैरकारभार उघड

मोहनवाडी-येरवडा सबस्टेशनमधील तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

पिंपरी । प्रतिनिधी

येन उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक आधीच उकाड्याने त्रस्त असताना महावितरणच्या गैरकारभारामुळे मोहनवाडी व येरवडा परिसरातील नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मोहनवाडी-येरवडा सबस्टेशन येथे उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शनिवारी पहाटे चार वाजता सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास पुन्हा वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती कामकाज, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, इंटरनेट सेवा तसेच व्यावसायिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. अनेक नागरिकांनी महावितरणच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, वाढत्या उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मोहनवाडी, कामगारनगर, पंचशील नगर, प्रतिकनगर, शास्त्रीनगर तसेच परिसरातील काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. “उन्हाळ्यात आधीच उकाडा असताना वारंवार लाईट जाण्याचे प्रकार सुरू आहेत. महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत असले तरी अशा घटना वारंवार घडत असल्याने देखभाल दुरुस्तीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सबस्टेशनवरील यंत्रणांची नियमित तपासणी व दुरुस्ती केली जाते का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत असून महावितरणने तत्काळ ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.