राजकारण

मनोज जरांगे आंदोलनावरून नवा वाद, भाजप आमदाराने केले शरद पवारांवर आरोप

Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलं आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) उपोषणावर ठाम असून, त्यांच्या मागणीला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभत आहे. या आंदोलनादरम्यान भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने आता खळबळ उडाली आहे.

जरांगे हे शरद पवारांचा “सुसाईड बॉम्ब”? :

भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथून मोठा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मनोज जरांगे हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांचे “सुसाईड बॉम्ब” आहेत. पवार जरांगे यांचा वापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सूचित केले. हे वक्तव्य होताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

संजय केणेकर यांनी शरद पवारांवर राज्यात नेहमीच अराजकता निर्माण करण्याचा आरोप केला. “पवारांनी कुणालाच मुख्यमंत्री पदावर कायम टिकू दिलं नाही. जाती-जातींत संघर्ष पेटवणं, दंगली घडवणं हे त्यांचं राजकारण राहिलं आहे. वसंतदादा पाटील ते वसंतराव नाईक यांच्या काळापर्यंत त्यांनी अशा घटना घडवल्या,” असा थेट आरोप त्यांनी केला.

Manoj Jarange | भाजपकडून आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया :

केणेकर पुढे म्हणाले की, फडणवीसांविषयी शरद पवारांना व्यक्तिगत आकस आहे आणि जातीय द्वेषाच्या आधारावर मनोज जरांगे यांना पुढे केले जात आहे.

त्यांच्या मते, जरांगे यांच्या आंदोलनामुळे गावागाड्यातील मराठा समाजाला दिशाभूल केली जात आहे. ओबीसी आरक्षणातील वाटेकरीपणाला विरोध करताना आता आंदोलनावरून “सुसाईड बॉम्ब”सारखे टोकाचे शब्द वापरले जाऊ लागले आहेत.