ताज्या घडामोडी

पुणे, पिंपरीत पुन्हा भाजपची सत्ता ? मुंबईतही सत्तांतराचा अंदाज

एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजप ९३ जागांचा अंदाज

– पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार

मुंबई : पीपल बाईट

राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांबाबत जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा मुंबई महापालिकेतही भाजपकडे सत्तांतर होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.पुणे महापालिकेत एकूण जागांपैकी तब्बल ९३ जागांवर भाजप विजयी ठरण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४३ ते ५५ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर पक्ष आणि अपक्षांची संख्या मर्यादित राहील, असेही एक्झिट पोलचे संकेत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून भाजपला ६४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५१ जागांवर राहणार असून शिवसेनेला ९ जागा, तर मनसेला एका जागेवर यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूणच पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबईत भाजपची ताकद वाढताना दिसत असून महापालिका निवडणुकांमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे.

विविध माध्यमांमध्ये एक्‍झिट पोलची वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे. असे असले तरी उद्या शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी अंतिम निकालानंतर या बाबत अधिक स्‍पष्टता येणार आहे.

——————–

बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३