सरपंच हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला सर्वात मोठा झटका!

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडची अडचण वाढली आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे कराडचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार असून, या खटल्यात तो अजूनही कोठडीत राहणार आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरण पुन्हा चर्चेत :
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर हे प्रकरण विधानसभेतही गाजले आणि त्याचा थेट राजकीय परिणाम होत धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, अजून एक आरोपी फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
मागील सुनावणीत कराडच्या वकिलांनी तब्बल तीन तासांचा युक्तिवाद करत त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही असे सांगितले होते. तरीही न्यायालयाने कराडविरोधातील गंभीर आरोपांचा उल्लेख करत जामीन अर्ज फेटाळला आहे.
दोषमुक्ती अर्जावर पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला
या प्रकरणातील काही आरोपींनी केलेल्या दोषमुक्ती अर्जावरही आज सुनावणी झाली. मात्र मूळ फिर्यादीचे म्हणणे न्यायालयात सादर झाले नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या अर्जांवर आता 10 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, न्यायालयाने काही आरोपींच्या अर्जांवर निर्णय राखून ठेवला आहे. पण वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर मात्र स्पष्ट निर्णय देत तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कराडच्या वकिलांकडून कोणते कायदेशीर पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
