ताज्या घडामोडी

शिराळा विधानसभा मतदारसंघात उद्या रंगणार राष्ट्रवादीचा मेळावा !

माजी आमदार शिवाजीराव नाईक समर्थकांचा पुढाकार, मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे.

सांगली ! पी. बी. लोखंडे

शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक पुन्हा राजकीय रणांगणात सक्रिय झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि नाईक समर्थकांचा शक्ती प्रदर्शन मेळावा उद्या सोमवारी (दि. १०) वाघवाडी (ता. वाळवा) येथील इंदिरा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, सत्कार सोहळा आणि पुढील निवडणुकीसाठीची रणनीती जाहीर होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्‍याला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

माजी आमदार नाईक समर्थकांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात संपर्क मोहिमेला गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर होणारा हा मेळावा कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश व उत्साह निर्माण करणारा ठरणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी सर्व समर्थकांना मेळाव्‍याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्‍या १५ दिवसांपासून ते मतदारसंघातील आपल्‍या समर्थकांना भेटून भूमिका जाणून घेत आहेत. त्‍यामुळे हा मेळावा महत्‍वाचा मानला जात आहे.

स्थानिक पातळीवर नाईक समर्थकांचा हा मेळावा म्हणजे शिराळा मतदारसंघात नाईकांकडून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाईक समर्थकांनी आपले संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला आहे.

————————-

बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३