ऐतवडे बुद्रुकमध्ये यंदाही जयंती महोत्सव उत्साहात साजरा होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा बैठकीत निर्धार
सांगली । प्रदीप लोखंडे
ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा, जि. सांगली) येथे यंदाही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण महोत्सव साजरा करण्याचा निर्धार जयंती महोत्सव समितीने व्यक्त केला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही १४ एप्रिल २०२६ रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी (१ मार्च २०२६) रात्री १० वाजता नियोजन बैठक पार पडली. या वेळी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
त्यानुसार १४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. त्यानंतर ९ ते १० या वेळेत भव्य दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या नंतर मुख्य मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक आकर्षक रथातून आयोजित केली आहे.
जयंती महोत्सव समिती, ऐतवडे बुद्रुक यांच्या पुढाकारातून सामाजिक एकोपा, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सर्व समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे
.——————————-
बातमीसाठी संपर्क : 7350266967
प्रदीप लोखंडे, संपादक पीपल बाईट न्युज.

