नगरपरिषद, पंचायत समिती नंतर आता जिल्हा परिषदेचा ‘करेक्ट कार्यक्रम’
– आमदार जयंत पाटील यांनी भाजपासह महायुतीला नमविले
सांगली ! प्रदीप लोखंडे
नगरपरिषद, पंचायत समिती नंतर आता जिल्हा परिषदेचा करेक्ट कार्यक्रम करण्याची किमया आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कासेगाव गटातील संगीता संभाजी पाटील यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या कुंडल गटातील ऋषिकेश महेंद्र लाड विजयी झाले.
अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून संगीता पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून डफळापुर गटातील स्वप्नाली मनोज मासाळ मैदानात होत्या. मतदानात संगीता पाटील यांना 34 मते मिळाली, तर स्वप्नाली मासाळ यांना 25 मते मिळाली. त्यामुळे संगीता पाटील यांनी स्पष्ट विजय मिळवत अध्यक्षपद पटकावले.
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांनी उमेदवारी दिली होती. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी डॉ. शितल बाबर व उपाध्यक्षपदासाठी हिम्मत जाधव यांनी अर्ज दाखल केले होते; मात्र त्यांनी नंतर माघार घेतली. भाजपकडून कामेरी गटातील जयराज पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मतदानात ऋषिकेश लाड यांना 34 मते मिळाली, तर प्रतिस्पर्ध्यांना 25 मते मिळाली. त्यामुळे ऋषिकेश लाड उपाध्यक्षपदी विजयी ठरले.
जिल्ह्यात काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त आघाडीने जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या जनादेशानंतर सत्तास्थापना करत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड एकमताने पार पाडली.
माध्यमांशी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील राजकारण स्थिर व सुस्थितीत राहावे, तसेच पुरोगामी व विधायक विचारसरणीने विकासाला चालना मिळावी, या भूमिकेतून आघाडीने एकदिलाने काम केल्याचे नेत्यांनी सांगितले. शिवाजीराव नाईक यांच्या काळापासून सुरू असलेली विकासाची परंपरा पुढे नेण्याचा सर्वांचा निर्धार आहे.ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि वित्त आयोगाच्या निधीचा पारदर्शक वापर करण्यावर आघाडीचा भर राहणार आहे. गावांच्या मूलभूत समस्या सोडवून विकासकामांना गती देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
————
बातमीसाठी संपर्क : 7350266967

