ताज्या घडामोडी

प्रतिकनगरात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सूर्या टेरेससमोर दिल्ली चॅट हॉटेल शेजारी वारंवार समस्या; स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

येरवडा । प्रदीप लोखंडे 

प्रतिकनगर, येरवडा परिसरात ड्रेनेजच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सूर्या टेरेस इमारतीसमोर, दिल्ली चॅट हॉटेलच्या शेजारी ड्रेनेजचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून, स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या भागात शाळा, हॉटेल तसेच भाजीपाला विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. दुर्गंधीमुळे आजार पसरू शकतात, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या एकदाच नाही तर वारंवार उद्भवत आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

परिसरातील व्यावसायिकांनाही याचा फटका बसत आहे. हॉटेल व्यवसायिक आणि भाजी विक्रेत्यांना ग्राहक कमी होण्याची भीती आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. ड्रेनेज लाईनची योग्य दुरुस्ती करून ही समस्या कायमची सोडवावी, तसेच परिसराची नियमित साफसफाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

————————-

प्रदीप लोखंडे, संपादक, पीपल बाईट

संपर्क क्रमांक : 7350266967