आता वाळवेकरांचे ‘पायताण’ दाखविण्याची वेळ
– दिलीप पाटील यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघात
सांगली ! पीपल बाईट
महाराष्ट्राचे संस्कार ज्यांना माहिती नाही. त्यांना संस्कार शिकविण्याची नाही तर वाळवेकरांचे पायताण दाखविण्याची वेळ आल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप पाटील यांनी केला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेच्या निषेधार्थ आयोजित सांगलीतील सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या वेळी दिलीप पाटील बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, उत्तम जानकर, खासदार विशाल पाटील, मेहबुब शेख आरपीआयचे सचिन खरात, आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप पाटील म्हणाले की, राजाराम बापूंनी आम्हाला राजकारणात बोट धरून आणले. १९७३ रोजी वाळवे गावाचा असूनही मला इस्लामपूर येथील कारखान्याचा चेअरमन राजाराम बापूंनी केले. आपल्या बरोबरीच्या माणसांशी सन्मानाने वागायला पाहिजे, ही शिकवणूक बापूंनी दिली. अशा महामानवांवर कोणी बोलत असेल आणि त्याला उत्तर दिले नाही तर वाळवे सारख्या क्रांतीकारी गावात राहण्याचे आपण लायक नाही, अशी भावना आहे. अनेक जण संतापाने धडा शिकविण्याची भावना व्यक्त करत आहेत. टायगर अभी जिंदा है, हे दाखवून देऊ म्हणत होते. मात्र राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन बोलू नये या मताचे आम्ही आहोत. जयंत पाटील सारखे नेते होणार नाहीत. त्यांच्या सोबत उभा राहणे गरजेचे आहे. आमचे चार गेले थोडे दिवस राहिले. मात्र जाताना जयंत पाटील यांच्यावर टीका करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारच, असा इशारा पाटील यांनी दिला. जयंत पाटील यांना राजाराम बापूंच्या टीमने राजकारणात आणले. हातावरील फोडाप्रमाणे जपले. त्या जयंत पाटलांवर कोणी बोलले तर त्यांना धडा शिकविण्यासाठी आमचे मनगट घट्ट आहे, असेही पाटील म्हणाले.

