राजकारण

“पुण्यात राजकीय खलबते शिगेला !

  • उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसनेचे सचिन अहिर यांच्या बैठका,
  • इच्छुकांना मध्यरात्री फोन येण्याची शक्यता”

पुणे ! पीपल बाईट

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारीबाबतच्या चर्चांना निर्णायक वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी आपल्या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सलग बैठका व चर्चा सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांना रात्री उशिरा किंवा मध्यरात्री उमेदवारीचा फोन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटप, स्थानिक समीकरणे, सर्वेक्षण अहवाल आणि बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतले जात आहेत. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने नेतृत्व स्तरावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक आणि स्थानिक कार्यकर्ते फोनकडे डोळे लावून बसले असून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक निर्माण झाली आहे.

दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी निश्चित होताच प्रचाराला अधिकृत सुरुवात होणार असून नाराज नेत्यांची मनधरणी आणि बंडखोरी रोखणे हे पक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे. आजच्या रात्रीकडे पुण्यातील राजकीय भवितव्य ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.

—————–

बातमीसाठी संपर्क : 8329525643