ताज्या घडामोडी

येरवड्यातील प्रतिकनगर परिसरात पाणीपुरवठ्याचा ठणठणाट

दोन दिवस विस्कळीत नियोजनाने नागरिक त्रस्त

पुणे ! पीपल बाईट

येरवड्यातील प्रतिकनगर, पंचशील नगर आदी परिसरात रविवारी (दि. २१) आणि सोमवारी (दि. २२) पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रविवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद होता, तर सोमवारी केवळ कमी दाबाने पाणी उपलब्ध झाले. या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे विशेषतः विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि गृहिणींची मोठी गैरसोय झाली आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. “पाणीपुरवठा का बंद आहे याची आम्हाला माहिती नाही” असे सांगत अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागावर जबाबदारी झटकली. काही सोसायट्यांनी प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला असल्याची माहिती देण्यात आली; मात्र टँकरचा पुरवठा देखील वेळेवर आणि सर्वांना पुरेसा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दररोज पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वेळा नागरिकांना टँकर व बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक बिघडले असून नोकरदार वर्गालाही सकाळच्या तयारीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या अजब कारभारावर संताप व्यक्त केला असून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया :
नागरिकांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांशी संपर्क केला. व्हॉल्व मधील काही तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांना तत्काळ दुरुस्ती करण्याची सूचना दिली आहे. तसेच नानासाहेब परुळेकर विद्यालयाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात असून ते सुरू करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करत आहे. ते सुरू झाल्यास या भागातील पाण्याची समस्या मिटेल.

  • डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

प्रतिक्रिया :

यंदा पुरेसा पाऊस झालेला आहे. धरणसाठ्यात पुरेसे पाणी देखील आहे. मात्र प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. तसेच अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत लिखित स्वरूपात प्रसिद्धी पत्रक काढून देखील नागरिकांना कळविले जात नाही. त्यामुळे गैरसोय झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

राहुल जाधव, मंडल उपाध्यक्ष, भाजपा, येरवडा-फुलेनगर.

कोट :
वॉल्‍व मध्ये बिघाड झाल्‍याने एक दिवस पाणी पुरवठा विस्‍कळीत झाला होता. त्‍वरीत दुरूस्‍ती करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २२) आणि मंगळवारपासून (ता. २३) पाणी पुरवठा पुन्‍हा सुरळीत सुरू होईल.
एकनाथ गाडेकर, कार्यकारी अभियंता, बंडगार्डन पाणी पुरवठा विभाग.

————————–

बातमीसाठी संपर्क : 83295 25643