भोसरीत पुन्हा रंगणार राजकीय कुस्ती
- महापालिकेत लांडगे-लांडे- गव्हाणे या दिग्गजांच्या नेतृत्वाची लागणार कसोटी
पिंपरी ! पीपल बाईट
भोसरीतील राजकीय रणांगण पुन्हा तापू लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते, तर माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत लांडगे आणि गव्हाणे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय खेळीकडे सर्वांचे लक्ष आहे. या मतदारसंघात लांडगे-लांडे-गव्हाणे या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत धडा शिकविण्याचा निर्धार आमदार लांडगे यांनी केला असून, त्यांची टीम सज्ज झाली आहे. त्यामुळे लढतीचे स्वरूप आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यांना मानणारा मोठा वर्ग भोसरीत असून, पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडे यांना बळ दिल्यास पक्षाला फायदा होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अन्यथा इतरांच्या हातात सूत्रे गेल्यास राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, अशीही चर्चा आहे.
दरम्यान, विधानसभा पराभवानंतर अजित गव्हाणे यांचा करिष्मा महापालिकेत टिकेल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षाकडून त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र सध्या त्यांनी विशेष लक्ष घातले नसल्याचे दिसते. त्यामुळे भोसरीत राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार ? आमदार महेश लांडगे यांच्या समोर कोण सक्षम आव्हान उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमीसाठी संपर्क : ९९२२८८७८६१

