ताज्या घडामोडी

ऐतवडे बुद्रुक येथील एसटी सेवा होणार सुरू

इस्लामपूर बस स्थानक प्रमुख नंदकुमार जाधव यांच्या उपस्थितीत रस्त्यांच्या कामाची पाहणी

सांगली ! पी. बी. लोखंडे

शिराळा-आष्टा मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ऐतवडे बुद्रुक (जि. सांगली) गावातील एसटी बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-काॅलेजला जाणे, तसेच नागरिकांना दैनंदिन कामासाठी प्रवास करणे यात मोठा अडथळा येत होता. अखेर या समस्येवर तोडगा निघत असून, सोमवारपासून (दि. ३) पुन्हा एसटी सेवा सुरू होणार असल्याची माहिती इस्लामपूर बस स्थानकाचे प्रमुख नंदकुमार जाधव यांनी दिली आहे.

रस्त्यावरील खोदकाम आणि दुरुस्तीमुळे ऐतवडे बुद्रुक ते शिराळा आणि आष्टा दरम्यानच्या बस वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी वारंवार मागणी करूनही सेवा पूर्ववत सुरू झाली नव्हती. अखेर वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक, उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, आबासो चेंडके, प्रदीप फल्ले यांनी इस्लामपूर बसस्थानक प्रमुख नंदकुमार जाधव यांना प्रत्यक्ष गावात बोलावून रस्त्यांची परिस्थिती दाखवली.

यावेळी जाधव यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याचे पाहून सोमवारी म्हणजे तीन नोव्हेंबरपासून एसटी सेवा नियमित सुरू करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे ऐतवडे बुद्रुक तसेच परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

”गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीअभावी नागरिकांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. ज्यामुळे प्रवास खर्चात वाढ झाली होती. आता एसटी सेवा सुरू झाल्याने लोकांच्या प्रवासाची सोय होईल व विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही व्यत्यय येणार नाही, अशी आनंदाची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली.

– संदीप गायकवाड, उपसरपंच, ऐतवडे बुद्रुक.


बातमीसाठी संपर्क : 83295 25643