Pune Damini Pathak : पुणे शहर पोलिसांचे दामिनी पथक ठरतंय महिलांचं ‘लाइफगार्ड’! दोन आत्महत्या रोखून वाचवले प्राण
पुणे शहर पोलिसांचे दामिनी पथक हे महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दोन महिला पोलिसांनी दोन महिलांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.

Pune Damini Pathak : पुणे : शहर पोलिसांच्या दामिनी पथक हे फक्त महिलांच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर संकटसमयी जीवनरक्षक कवच ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोथरूड पोलिसांच्या दामिन मार्शलने आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या दोन उच्च शिक्षित महिलांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दामिनी पथकातील पोलीस शिपाई श्रुती कढणे आणि आरती जाधव असे या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कोथरूड पोलिस ठाण्याअंतर्गत त्या दामिनी मार्शलवर कर्तव्यावर आहेत. श्रुती कढणे या राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेत्या बॉक्सिंग खेळाडू आहेत. त्या स्व:अनुभवाचा उपयोग करून शाळा-कॉलेजमधील मुलींना सेल्फ डिफेन्सचे मार्गदर्शन करतात. सतत महिलांशी, विद्यार्थिनींशी व जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत जनजागृती करण्याचे काम श्रुती कढणे करतात.
कोथरूडमधील करिष्मा सोसायटीत २६ वर्षीय तरुणीने नैराश्यातून औषधांचे सेवन केले होते. ही माहिती दामिनी पथकाला मिळाली. लागलीच श्रुती कढणे व आरती जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला रुग्णालयात घेऊन जात वेळेत उपचार मिळवून दिले. नंतर तिला धीर देत तिची समजूत घातली. तसेच आत्महत्येच्या मार्गावरून परावृत्त केले. घटस्फोटाच्या मानसिक तणावातून तिने हे पाऊल उचलले होते. दुसऱ्याच दिवशी आणखी एक घटना अशीच घडली. तेथे दामिनी पथकाने धाव घेत या तरुणीला धीर दिला. मयूर कॉलनीत महिला कौटुंबिक कारणातून आई-वडिलांसोबत राहते. तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या तयारीत होती. या वेळीही दामिनी पथकाने तिथे धाव घेत तिचे मन परावृत्त करून प्राण वाचविले. तिला “प्रत्येक अडचणीला मार्ग असतो, स्वतःचा जीव घेणे चूक आहे” असे समजावत सुरक्षितपणे आई-वडिलांकडे सुपूर्द केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही कामगिरी केली.

