‘…तर महाराष्ट्रातील एकही मराठा घरी दिसणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा वातावरण पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे समितीने जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र, जरांगे यांनी थेट इशारा देत म्हटले की, “हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही.” (Maratha Reservation)
‘एकही मराठा घरी दिसणार नाही’ – जरांगे यांचा इशारा :
जरांगे पाटलांनी स्पष्ट चेतावणी दिली की, “शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर महाराष्ट्रातील एकही मराठ्याचं लेकरूबाळ घरी दिसणार नाही. अजून सहा-सात दिवस तुमच्याकडे आहेत. त्यानंतर कोणताही विलंब सहन केला जाणार नाही. मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे, हे जाहीर करा आणि उद्यापासून प्रमाणपत्र वाटप सुरू करा.” (Manoj Jarange)
याचबरोबर त्यांनी शिंदे समितीकडे असलेला अहवाल त्वरित लागू करण्याची मागणी केली. “तुम्ही अहवाल घ्या आणि अंमलबजावणी करा. वेळ घालवला तर मराठा समाज शांत बसणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
Manoj Jarange | हैद्राबाद-सातारा गॅझेट तात्काळ लागू करा :
जरांगे पाटील पुढे म्हणाले, “सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करा. औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटसाठी आम्ही 15-20 दिवस देऊ. पण हैद्राबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेट लागू करण्यासाठी एक मिनिटही देणार नाही. शिंदे समितीने 13 महिने अभ्यास केला आहे. या गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा कुणबीच आहे, यात वाद नाही आणि तोडच नाही.”
सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “बलिदान दिलेल्या लोकांशी खेळ करू नका. ज्यांनी प्राण दिले त्यांना नोकरी दिली जात नाही, निधी मिळत नाही. आमदारांच्या सभेला कोटी रुपये उधळले जातात, पण बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपये आणि नोकरी ही त्यांचीच घोषणा आहे, त्यावर तडजोड होणार नाही. केस मागे घ्या, आणि आमच्यावर हल्ला केलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करा.”

