पीएमआरडीए मुख्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी
पिंपरी, ता. २७ : कृषीक्रांतीचे प्रणेते व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास मानवंदना देण्यात आली.
शोषित, वंचित व शेतकरीवर्गाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषिमंत्री होते. सन १९५२ ते १९६२ या कालावधीत कृषिमंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी शेती, शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी दूरगामी व क्रांतिकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या धोरणात्मक निर्णयांमुळे भारतीय शेतीला नवी दिशा मिळाली. शिक्षण, शेती आणि समाजप्रबोधन या तिन्ही क्षेत्रांतील डॉ. देशमुख यांचे योगदान महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास विकास परवानगी विभागाचे सहाय्यक नगररचनाकार संगमेश्वर पन्नासे, अभियांत्रिकी विभागाचे कनिष्ठ अभियंता गोविंद सरगर, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

