गणेशोत्सवात मिठाई दुकानांवर एफडीएचे ‘लक्ष’
शहरातील १७ दुकानांची तपासणी, ३८ नमुने प्राप्त
पुणे ! पीपल बाईट
गणेशोत्सव म्हटले की घराघरांत गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. या दिवसांत नागरिक मिठाई खरेदी करण्याकडे अधिक कल दाखवतात. मात्र, वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही व्यापारी दर्जाहीन अथवा नियमबाह्य मिठाई विक्रीसाठी ठेवतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष तपासणी मोहीम राबविली आहे.
राज्य शासनाने “फेस्टिव्हल ड्राईव्ह” या उपक्रमांतर्गत ही मोहीम हाती घेतली. या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील विविध भागांतील मिठाई दुकाने, हलवाई आस्थापन आणि गोडधोड पदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान गोड पदार्थांची साठवण, स्वच्छता, वापरलेले घटकद्रव्य, तसेच उत्पादनावरील माहिती यांची बारकाईने पाहणी करण्यात आली. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या मोहिमेत पुणे जिल्ह्यात एकूण ५५ दुकानांची तपासणी झाली. त्यामध्ये तब्बल १०१ मिठाई नमुने अधिकाऱ्यांनी घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १७ मिठाई दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, येथून ३८ नमुने संकलित करण्यात आले आहेत. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार मिठाई मिळणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. गणेशोत्सव काळात मिठाईची खपत वाढल्यामुळे या क्षेत्रातील निरीक्षण अधिक कडक केले आहे. तपासणीदरम्यान कुठल्याही दुकानात नियमभंग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सवाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांनाही जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिठाई खरेदी करताना तयार दिनांक, पॅकिंगवरील माहिती, तसेच स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने तयार केलेली किंवा जुनी मिठाई आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
या बाबत पुण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे मिठाई विक्रीचा व्यवसाय वेगाने वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. या तपासणी मोहिमेमुळे दुकानदारांमध्येही सजगता निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करूनच व्यवसाय करणे आवश्यक असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा सण आहे. मात्र, या आनंदात कुठलाही आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी एफडीएची ही कारवाई महत्वाची ठरली आहे.
बातमीसाठी संपर्क : 8329525643

