ताज्या घडामोडीपुणेराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजकीय ‘डाव’

  • पिंपरीत राष्ट्रवादी परिवार मिलन उपक्रमातून लोकप्रतिनिधींशी थेट संवाद
  • कार्यकर्त्यांचा उत्‍साह वाढविण्याचा प्रयत्‍न

पीपल बाईट : प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्‍या तोंडावर सर्वच पक्षाकडून स्‍वबळाचा नारा दिला जात आहे. ही स्‍थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पिंपरी-चिंचवड मध्ये नवे राजकीय समिकरण साधले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दोन दिवस शहरात दौरा निश्‍चित करण्यात आला. यामध्ये जनसंवाद आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील १३ ठिकाणी थेट स्‍थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांशी संपर्क साधून संवाद केला. कार्यकर्त्यांचा उत्‍साह वाढविण्याचा हा प्रयत्‍न असल्‍याची चर्चा आहे. यामुळे आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणांवर या दौऱ्याचा परिणाम होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपरी विधानसभा क्षेत्रात महत्त्वपूर्ण दौरा ठरला. या दौऱ्यात त्‍यांनी स्थानिक नागरिक, समाजसेवक, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधून प्रलंबित विकासकामांचा व तातडीच्या प्रश्नांचा आढावा घेतला आहे. सकाळी आठ वाजता दापोडी प्रभागातून राष्ट्रवादी परिवार मिलनाची सुरूवात झाली. नजीर मुजावर एसएमएस कॉलनी या ठिकाणी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. फुगेवाडीतील विठ्ठल मंदिरासमोर स्थानिक प्रतिनिधींची भेट घेतली. या ठिकाणी कराटे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपली मते या वेळी मांडली. तसेच नागरिकांनी आपल्‍या समस्‍यांबाबत माहिती दिली. कासारवाडीत मंत्री रेसिडेन्‍सी येथे माजी नगरसेवक शाम लांडे यांच्‍या निवासस्‍थानी भेट दिली. या वेळी कार्यकर्ते, नागरिक यांच्याशी संवाद साधला. पक्ष संघटन विषयीच्या भावना, मते जाणून घेतली. त्यानंतर कासारवाडी मेट्रो स्टेशनला भेट देऊन नागरिकांनी मांडलेल्या समस्‍या प्रशासकीय स्तरावर सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

संत तुकाराम नगर येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. या ठिकाणी कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी तसेच इतर नागरी समस्यांचे निराकरण करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महात्मा फुलेनगर येथे महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन सर्वच समाजघटकातील शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना केल्‍याचे नमूद केले. सावित्रीबाई फुले भाजी मंडई येथे भेट देऊन विक्रेत्यांच्‍या प्रश्‍नांबाबत चर्चा केली. रमाबाई नगर येथील माजी सभापतींच्‍या कार्यालयाला भेट दिली. चिंचवडमधील गावडे नगर येथे चाय पे चर्चा करत कार्यकर्त्यांसोबत राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर संवाद साधला. तसेच पिंपरीच्या नाणेकर चाळ परिसरात नागरिकांच्‍या प्रश्‍नाबाबत निवेदने स्‍वीकारली. मिलिंदनगर, पिंपरीगाव येथे पदाधिकाऱ्यांच्‍या कार्यालयांना भेट देऊन संवाद साधला.

पक्षाची पकड वाढविण्यावर भर –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेण्याबरोबरच आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी तळागाळापर्यंत पक्षाची पकड वाढवण्यावर भर दिला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्‍यातील युती सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी असली तरी गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात महापालिका निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. अशातच अजित पवारांचा दौरा हा केवळ कार्यक्रम नसून कार्यकर्त्यांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. यामुळे आगामी काळात शहरातील राजकीय समीकरणांवर या दौऱ्याचा परिणाम होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातमीसाठी संपर्क : 8329535643