आमदार सत्यजित देशमुख यांच्यावर सांगली ग्रामीणची जबाबदारी
– भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रमुख नेमणूक
सांगली : पी. बी. लोखंडे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली असून, निवडणूक प्रमुखांच्या नेमणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार सांगली ग्रामीण मतदारसंघाची जबाबदारी आमदार सत्यजित देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्ष संघटन बळकटीसाठी तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्याच्या दृष्टीने ही नेमणूक महत्त्वाची मानली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही निवड केली आहे.
भाजपच्या सांगली जिल्ह्यातील शहरी भागाची जबाबदारी शेखर इनामदार यांच्याकडे देण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात स्वतंत्र निवडणूक प्रमुख नेमल्याने पक्षाचे काम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुका पार पडणार असून, त्यासाठी पक्षाने आता संघटनात्मक तयारी सुरू केली आहे.
आमदार सत्यजित देशमुख हे संघटनशील आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यावर ग्रामीण भागातील निवडणुकीची मोठी जबाबदारी देऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी काही दिवसांत प्रचार यंत्रणा आणि रणनितीची रूपरेषा ठरविण्याचे काम सुरू होणार आहे.
बातमीसाठी संपर्क : 8329525643

