ताज्या घडामोडीपुणे

सरसकट कर्जमाफी करण्याची दानत दाखवा : आमदार रोहित पवार

– देहूत लाक्षणिक उपोषण दरम्यान शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला सुनावले खडे बोल

देहू ! पीपल बाईट

मराठवाड्यासह राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे अनुसरण करून महायुती सरकारने दानत दाखवावी,’ अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीतर्फे सोमवारी (दि. 21) देहू येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी आमदार रोहित पवार बोलत होते.

या वेळी पक्षाच्या वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप दत्ता महाराज दोन्हे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लाक्षणिक उपोषणादरम्यान सरसकट कर्जमाफीची योजना त्वरित अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात जयदेव गायकवाड, पंडित कांबळे, विक्रांत पाटील, अनिल पवार, राहुल मखरे, मनाली भिलारे, प्रशांत जगताप, तुषार कामठे, देवदत्त निकम, विकास लवांडे, रविकांत वर्षे, सुनील माने, स्वाती पोकळे, भारती शेवाळे, ज्योती निंबाळकर, किशोर कांबळे, प्रमोदसिंह गोतरणे, इम्रान शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणापूर्वी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते.

या वेळी आमदार पवार म्हणाले की, “राज्यातील ६७ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. ९० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, आपण कुटुंबाचा विचार केला, तर ही झळ ४-५ कोटी नागरिकांना बसली आहे. शेतकरी शेतमजूर अडचणीत असतील, तर आपण दिवाळी साजरी कशी करायची? आम्ही या भूमिकेचा स्वीकार करीत दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली असताना आपल्याला वारंवार सरकार किती असंवेदनशील आहे, हेच दिसून आले. सरकारमधील मंत्री बूट खराब होऊ नयेत म्हणून शेतात न जाता रस्त्यावरूनच शेतांची पाहणी करून गेले. तालुक्याच्या ठिकाणी बैठका मेळावे घेतले. नुसती ३२ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. त्यात विमा कंपनीकडून मिळणारे पैसेही गृहीत धरले. रोजगार हमी योजनेतून खरवडून गेलेल्या जमिनींच्या दुरूस्तीचे काम करू, अशा घोषणा केल्या आहेत.

पण, आतापर्यंत रोजगार हमी योजनेचे तीन हजार कोटी रुपये थकित असताना, हे नवीन आश्वासन देण्यात येत आहे. हा नुसता देखावा आहे. सरकारने नुकतीच ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ४३०० कोटी रुपयांची मदत दिली. या मदतीचा आकडा पाहिला, तर प्रतिशेतकरी ८२०० रुपये एवढीच मदत दिल्याचे दिसते. जाहीर केलेल्या पॅकेजमधील ३२ हजार कोटी रुपयांचा आकडाही प्रत्यक्षात १२ हजार कोटींच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपयांची देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.

—————-

बातमीसाठी संपर्क : 8328525643