ताज्या घडामोडी

बाबासाहेबांच्या सामाजिक ऐक्याचा वारसा पुढे जोपासू

  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतवडे बुद्रुक येथील भीम अनुयायी यांचा निर्धार

सांगली ! पी. बी. लोखंडे

सामाजिक एकोपा राखून संविधानिक मूल्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी बाबासाहेबांच्या सामाजिक ऐक्याचा वारसा पुढे जोपासू. शिक्षण, राजकारण, समाजकारण या नीती मूल्याचे योग्य जतन करू, असा निर्धार ऐतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथील भीम अनुयायी यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतवडे बुद्रुक येथील पुतळ्यास सर्व महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भीम अनुयायी आपल्या भावना व्यक्त करत होते.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे म्हणाले की, संधीची समानता देण्यासाठी बाबासाहेबांनी पूर्वीच्या मागास ठरविलेल्या समाजाला आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे आरक्षण मिळालेल्या प्रत्येक प्रवर्गात दर्जेदार विद्यार्थी, नोकरदार घडत आहेत. अनेक जण आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत आहेत. बाबासाहेबांच्या सामाजिक एकोप्याचे आवाहन करत संविधानिक मूल्य अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे मत महेश कांबळे यांनी व्यक्त केले.

पोपट कांबळे म्हणाले की, आताचे युग सोशल मिडियाचे आहे. या काळात काही चांगल्या तर काही विकृत प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यांच्याकडून महापुरुषांच्या विषयी अपप्रचार केला जात आहे. त्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी तरुणांनी इतरांचे सामाजिक प्रबोधन केले पाहिजे. सोशल मीडियाच्या चुकीच्या भूलथापांना तरुणांनी बळी पडू नये. समाजातील युवकांनी पुढे येऊन सामाजिक कामे पुढे घेऊन जायला सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मंदा सोनटक्के म्हणाल्या की, बाबासाहेबांनी प्रचंड त्याग करून देशात समानता आणली. बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गक्रमण करताना प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची आणि सामाजिक प्रगती करण्यावर भर दिला पाहिजे. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून अनेक जण त्यांची कामे पुढे घेऊन जात आहे. त्यासाठी अधिक रित्या सक्षम होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे त्या म्हणाल्या.

भीमराव कांबळे म्हणाले की, बाबासाहेबांनी समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी अपार कष्ट सोसले. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने अभिवादन करण्यासाठी यायलाच हवे. बाबासाहेबांनी केलेलं उपकार आपण फेडू शकत नाही. मात्र त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या कराव्यात.

प्रदीप लोखंडे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. सध्या निवडणुक सुरू आहे. मतदानाचा हक्क बजावून चांगले लोकप्रतिनिधी निर्माण करणे हे सक्षम लोकशाही निर्माण करण्याचे पाऊल आहे. विद्यापीठीय शिक्षण घेऊन बौद्धिक क्षमता वाढवावी. सामाजिक एकोपा राखण्याचे आवाहन केले.

दरम्यान देवदास कांबळे, संदीप कांबळे, लखन थोरात यांनी पुतळा परिसराची स्वच्छता केली. या कार्यक्रमात सर्वच भीम अनुयायांनी सहभाग घेतला. पोपट कांबळे, मंदा सोनटक्के यांनी त्रिसरण, पंचशील घेतले.

—————–

बातमीसाठी संपर्क : 8329525643