कामेरी जिल्हा परिषद गटाची पाटीलकी कोणाकडे ?
– जयराज पाटील विरुद्ध रणजीत पाटील यांच्यात सामना रंगण्याची शक्यता.
सांगली ! पी. बी. लोखंडे
सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यातील कामेरी जिल्हा परिषद गट या वेळेस चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या गटासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणांना अचानक वेग आला आहे. या गटात परंपरेने जयराज पाटील आणि रणजीत पाटील या घराण्याचा प्रभाव राहिला असला तरी यंदा दोन्ही पाटील गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच डॉ. रणजीत पाटील हे देखील या सामन्यात उतरणार असून त्यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.
भाजपकडून माजी सरपंच जयराज पाटील यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपली राजकीय तयारी सुरू केली असून, नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केलेला वाढदिवस हा त्यांचा शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न मानला जात आहे. तालुक्यातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करून जयराज पाटील यांनी आपली ताकद दाखवली असून, मतदारसंघात त्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह वातावरण असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) कडून अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नसला तरी आमदार जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला तर रणजीत पाटील हे उमेदवारीसाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे. रणजीत पाटील हे स्थानिक स्तरावर चांगली पकड असलेले नेते मानले जातात. जयंत पाटील यांच्या आदेशावर त्यांची उमेदवारी निश्चित झाली, तर ही लढत तुल्यबळ आणि अत्यंत रंगतदार ठरणार आहे.
कामेरी गटातील मतदारसंख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे आणि येथे गावागावातील जातीय-सामाजिक समीकरणांबरोबर वैयक्तिक संपर्क महत्त्वाची भूमिका बजावतात. या गटात कामेरी, विठ्ठलवाडी, ठाणापुढे, डोंगरवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक, कार्वे, ढगेवाडी, जक्राईवाडी, करंजवडे अशी महत्त्वाची गावे येतात. या प्रत्येक गावात आपापले स्थानिक नेते व प्रभावी मतदार आहेत, ज्यांच्या पाठिंब्यावर निकालाचा तोल ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून माजी आमदार शिवाजीराव नाईक देखील सक्रिय झाले आहेत. युती धर्म म्हणून ते जयराज पाटील यांच्या प्रचारात उतरतील का, की स्वतंत्र उमेदवार देतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजप पक्षातील महाडिक समर्थक आपला स्वतंत्र दावा मांडत असल्याने भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीची शक्यता व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका थेट जयराज पाटील यांना बसू शकतो, आणि त्याचा फायदा रणजीत पाटील यांना मिळू शकतो, अशी स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
कामेरी गटातील आगामी निवडणूक ही वाळवा तालुक्यातील सर्वाधिक चर्चेची ठरेल यात शंका नाही. एकीकडे जयराज पाटील यांचा विकासाचा आणि कार्यकर्त्यांचा आधारभूत गट, तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या आशिर्वादावर रणजीत पाटील यांची प्रतिमा या दोन शक्तींची थेट लढत जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीला निश्चितच रंगत आणणारी ठरणार आहे.
—————–
बातमीसाठी संपर्क : 8329525643

