ग्राउंड रिपोर्टराजकारण

चिकुर्डे जिल्हा परिषद गटात रंगणार राजकीय ‘नुरा कुस्ती’

अशोक पाटलांना आव्हान; पी.आर. पाटील आणि अभिजित पाटील यांची भूमिका निर्णायक

सांगली | पी. बी. लोखंडे

चिकुर्डे जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात चुरस वाढली आहे. या गटात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अभिजित पाटील आणि राजारामबापू कारखान्याचे माजी चेअरमन पी.आर. पाटील यांचे चिरंजीव संजीवकुमार पाटील यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी आपला उमेदवार दिल्यास चार जणांचे राजकीय रिंगण रंगण्याची शक्यता आहे.

भाजपचे उपाध्यक्ष अशोक पाटील यांना यंदा कडवे आव्हान मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महायुतीमधील काही नेते अंतर्गत पातळीवर त्यांच्याविरोधात भूमिका घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या गटातील निवडणुकीचे समीकरण महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत डावपेचांवर अवलंबून राहणार आहे. अशोक पाटील यांनी मागील काळात कुरळप ग्रामपंचायतीतील पी.आर. पाटील यांच्या सत्तेला धक्का दिला होता. हा पराभव पी.आर. पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते अशोक पाटील यांचा विजय रोखण्यासाठी रणनीती आखतील, अशी चर्चा आहे.

वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाल्यास ते स्वतःचा घरातील उमेदवार उभा करतील. किंवा अभिजित पाटील यांना पाठिंबा देण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अभिजित पाटील हे सर्वसामान्यांशी जवळीक आणि तगडा जनसंपर्क यामुळे चर्चेत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना कुरळप वगळता इतर गावांमधून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यंदाही ते पूर्ण ताकदीने रणांगणात उतरणार असल्याचे संकेत आहेत. गावा-गावातील नातेसंबंध आणि युवकांमधील लोकप्रियता हे त्यांचे बलस्थान मानले जाते.

या गटात चिकुर्डे, कुरळप, देवर्डे, ऐतवडे खुर्द, वशी, लाडेगाव, इटकरे अशी प्रमुख गावे आहेत. कुरळप वगळता सर्व गावात अभिजित पाटील यांना मताधिक्य आहे. असे असले तरी आघाडी किंवा युती होण्यावर संपूर्ण चित्र अवलंबून आहे.

महायुतीत अंतर्गत कुरघोडीची चर्चा –

महायुतीमधील काही वरिष्ठ नेते आपल्या इतर गटांतील उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी चिकुर्डे गटात शांत राहण्याची भूमिका घेतील, अशी चर्चा आहे. अशोक पाटील यांची राजकीय ताकद वाढल्यास इतर नेत्यांचे प्राबल्य कमी होईल, अशीही भीती काहींना असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. परिणामी, पडद्यामागे विरोधी उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पी.आर. पाटील पंचायत समितीकडे लक्ष केंद्रीत करणार?

अभिजित पाटील यांना जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, तर पी.आर. पाटील हे चिकुर्डे व कुरळप गणासाठी राष्ट्रवादीसाठी आग्रह धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गणात आपले उमेदवार विजयी करण्यासाठी ते राजकीय डावपेच आखतील, असे संकेत मिळत आहेत. राजकीय समीकरणे आणि नेत्यांची अंतर्गत भूमिका यामुळे चिकुर्डे जिल्हा परिषद गटातील ही लढत यंदा ‘नुरा कुस्ती’ ठरणार, हे निश्चित आहे.

—————-

बातमीसाठी संपर्क : 8329525643