पुणे

लोहगावच्या समस्येवर आमदार बापूसाहेब पठारे ऑन फील्ड

– रस्ते, पाणीपुरवठा व ड्रेनेज समस्यांवर अधिकाऱ्यांसह पाहणी

पुणे ! पीपल बाईट

लोहगाव भागात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज समस्यांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारे ऑन फिल्ड होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसरात महत्त्वपूर्ण पाहणी दौरा आमदार पठारे यांनी घेतला. या वेळी स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या गंभीर प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना आवश्यक असल्याने विविध ठिकाणांची प्रत्यक्ष स्थिती तपासण्यात आली.

या पाहणीमध्ये पवार वस्ती, माळवाडी वस्ती रोड (सोमेश्वर मंदिरापर्यंत), काळभोर वस्ती, वाघमारे वस्ती आणि संत नगर पठारे वस्ती या भागातील रस्त्यांची सध्याची परिस्थिती पाहिली. अनेक ठिकाणी रस्त्यांची झालेली दुरवस्था, तुटलेली ड्रेनेज लाईन, पावसाळ्यात निर्माण होणारी चिखलदाणी आणि पाणीपुरवठ्यातील अनियमितता यामुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींचा आढावा घेतला.पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांबाबत माहिती घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक रस्ते दुरुस्ती, पाइपलाइनचे बदल, ड्रेनेज सुधारणा आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

लोहगाव परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत या सर्व मूलभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. पाहणीमुळे स्थानिकांमध्ये कामांना गती मिळेल आणि दीर्घकाळ प्रलंबित समस्यांचा लवकरच निराकरण होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

————–

बातमीसाठी संपर्क : 8329525643