महापालिकेसाठी आरक्षण सोडत लवकरच
– प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीची होणार कार्यवाही
– राज्य निवडणुक आयोगाचे महापालिका आयुक्तांना निर्देश
पुणे ! पीपल बाईट
महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणुक आयोगाने मार्गदर्शक अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे आरक्षण प्रक्रियेची जबाबदारी राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार आयुक्तांकडून प्रथम आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास आयोगाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील जागांचे आरक्षण, सोडत प्रक्रिया, हरकती व सूचनांचा विचार आणि अंतिम अधिसूचना या सर्व टप्प्यांची अंमलबजावणी करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
त्यानुसार आयुक्तांकडून आयोगाच्या सूचनेनुसार लवकरच आरक्षण सोडतीची कार्यवाही केली जाणार आहे. नुकतीच पुणे महापालिकेसाठी ४१ प्रभागाची अंतिम रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १६४ नगरसेवक असणार आहेत. आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लवकरच पार पडला जाणार आहे. त्याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले होते. त्यावर अनेकांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे. निवडणुक आयोगाच्या या आरक्षण सोडतीला देखील लवकरच मुहुर्त लागणार असून राज्य निवडणुक आयोगाकडून आरक्षण सोडतीबाबत मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार पुणे महापालिका आयुक्तांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अशी असेल प्रक्रिया –
– अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि सर्वसाधारण महिलासह सर्व प्रवर्गांतील महिला आरक्षणाची सोडत सार्वजनिकपणे आयोजित होणार.
– राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन सोडतीची प्रक्रिया पार पाडली जाणार.
– सोडतीचा दिनांक, वेळ आणि स्थळ वृत्तपत्रे, नोटीस बोर्ड, आणि वेबसाईटवरून जाहीर होणार.
– सोडतीनंतर नागरिकांना आरक्षणावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मिळणार कालावधी.
– सर्व हरकतींची नोंदवही ठेवून, त्यांचा विचार करून आवश्यक सुधारणा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात येणार.- आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतरच आरक्षणाची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
बातमीसाठी संपर्क : 8329525643

