पुणे

प्रभाग क्रमांक दोनमधील जलवाहिनी कामाला सुरुवात

पुणे ! पीपल बाईट

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये नागरिकांच्या पाणीपुरवठा समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचे जलवाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. शांती रक्षक चौक ते सह्याद्री हॉस्पिटल या मुख्य मार्गावर ६०० मिलिमीटर व्यासाच्या नवीन पाईपलाईनची उभारणी करण्यात येत असून, या कामामुळे परिसरातील पाणीपुरवठा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

सध्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्यांची खोदाई सुरू असून, गाजुल कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेकडून कामाची जबाबदारी पार पाडली जात आहे.या जलवाहिनीमुळे प्रभागातील विस्तारीत भागांना स्थिर, नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना अनियमित पाण्याचा ताण सहन करावा लागत होता. विशेषतः नव्याने वाढलेल्या वस्त्या, वसाहती आणि व्यावसायिक भागांमध्ये पाणी दाब कमी असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या.

नवीन पाईपलाईनमुळे पाण्याचा दाब सुधारणार असून, भविष्यातील वाढत्या गरजांना देखील ही लाईन पूरक ठरणार आहे.प्रभागातील वाहतूक व्यवस्थेवर कामाच्या काळात तात्पुरता परिणाम होणार असला तरी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कामासाठी १२ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून, वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रभाग क्रमांक दोनमधील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक मजबूत होऊन शांतीनगर, सह्याद्री हॉस्पिटल परिसर आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

——————-

बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३