महाराष्ट्र

परिवर्तन चळवळीचा मानबिंदू : डॉ. बाबा आढाव

लेखक : अरुण बोऱ्हाडे

सामाजिक परिवर्तन आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झिजलेले पुण्यातील थोर व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबा आढाव. १ जून १९३० रोजी जन्मलेले बाबासाहेब पांडुरंग आढाव हे महाराष्ट्रासह देशभर डॉ. बाबा आढाव या नावाने परिचित झाले. समाजवादी विचारसरणी, लढाऊ बाणा आणि निःस्वार्थ कार्य ही त्यांची ओळख. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता आणि त्यांनी ही विचारधारा प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेली. असंघटित कष्टकरी वर्गाची संघटना, हक्कांची जाणीव आणि हक्कांसाठी संघर्ष हा त्यांचा जीव्हाळ्याचा विषय. ‘हमाल पंचायत’ ही त्यांची भूषणास्पद कामगिरी. कष्टकरी वर्गाला सामाजिक प्रतिष्ठा देणे, सरकारकडून न्याय मिळवून देणे आणि ‘ना नफा–ना तोटा’ तत्वावर ‘कष्टाची भाकर’ केंद्रे उभी करणे हा त्यांचा मोठा रचनात्मक उपक्रम. रिक्षा पंचायत, अपंग कष्टकरी पंचायत, कागद-काच- पत्रा कामगार संघटना, बांधकाम कामगार पंचायत अशा विविध संघटनांतून त्यांनी वंचित वर्गाला आवाज दिला.

महात्मा फुले यांच्या “एक गाव, एक पाणवठा” संकल्पनेला त्यांनी चळवळीचे स्वरूप दिले. देवदासी प्रथा निर्मूलन, आदिवासी स्त्री-मुक्ती, रोजगार हक्क परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन या सामाजिक सुधारणांच्या आघाड्यांवर ते नेहमी अग्रभागी राहिले. महिलांच्या समान हक्कांचे ते प्रखर पुरस्कर्ते होते. जातीभेद, वर्णव्यवस्था आणि सामाजिक विषमतांना त्यांनी कडाडून विरोध केला. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांत त्यांचा सहभाग सतत राहिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, आणीबाणीविरोधी संघर्ष, धरणग्रस्तांचे प्रश्न, दलित-भटक्या-विमुक्तांचे हक्क प्रत्येक आंदोलनात ते रस्‍त्‍यावर लढाऊ बाण्याने दिसले. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातही त्यांनी ठाम भूमिका घेतली. समाजवादी नेते एस.एम. जोशी, ना. ग. गोरे आणि डॉ. लोहिया यांच्या सहवासात ते दीर्घकाळ कार्यरत राहिले.

पुणे महानगरपालिकेत दोनदा सदस्य म्हणून निवडून येऊनही त्यांनी तत्वनिष्ठ राजकारणाचे भान सोडले नाही. गरीब, शोषित, असंघटित कष्टकऱ्यांचे खरे ‘साथीसोबती’ म्हणूनच समाजाने त्यांना ओळखले. त्यांच्या नेतृत्वाची उंची मोजण्याची कोणतीही मापने नाहीत. डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण जीवन म्हणजे समतेची, न्यायाची आणि मानवतेची साधना. कष्टकरी वर्गाच्या सुखदुःखात समरस होणारा हा लढवय्या नेता आता आपल्यात नसला, तरी त्यांचे कार्य, विचार आणि संघर्षाची मशाल कायम पेटतीच राहील.

डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

———————————————–