राहुल जाधव, सुधीर वाघमोडे, पूजा जाधव, रेणुका चलवादी यांना उमेदवारी
– प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपचे पॅनेल
पुणे ! पीपल बाईट
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन (नागपूर चाळ–फुलेनगर) येथील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर भाजपने या प्रभागासाठी आपले अधिकृत पॅनेल निश्चित करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे.भाजपकडून सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून राहुल जाधव, ओबीसी पुरुष प्रवर्गातून सुधीर वाघमोडे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून पूजा जाधव आणि अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून रेणुका चलवादी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे चौघे उमेदवार प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या प्रभागातून भाजपकडून याआधी सुभाष चव्हाण, सचिन धिवार, अय्युब शेख, आदिती बाबर यांच्यासह काही इच्छुकांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील चर्चा, स्थानिक समीकरणे आणि सामाजिक संतुलन लक्षात घेऊन अखेर हे पॅनेल निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर चाळ–फुलेनगर परिसरात मिश्र लोकसंख्या असून, सर्वसाधारण, ओबीसी व एससी प्रवर्गातील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे चारही प्रवर्गांचे प्रतिनिधित्व करणारे पॅनेल देत भाजपने संतुलित डाव टाकल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रचाराची तयारी वेगाने सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रभागात भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार थेट आव्हान उभे करणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक दोनमधील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येणार असून, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि संघटनात्मक ताकद यावरच निकाल अवलंबून राहणार असल्याचे चित्र आहे.
——————–
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

