रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
आमदार शंकर जगताप यांच्याकडून कामाचा आढावा
पिंपरी | पीपल बाईट
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रक्षक चौक येथे उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) व अंडरपासचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला होणार आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती आणि वाकड परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला होता.
चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी नुकताच कामाचा आढावा घेतला. प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा आढावा घेतला व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.या उड्डाणपूल व अंडरपासमुळे औंध ते रावेत, वाकड फाटा ते औंध तसेच पिंपळे निलख ते पुणे या मार्गांवरील वाहतूक सिग्नलमुक्त आणि अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे प्रवासातील अडथळे दूर होऊन नागरिकांचा वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेविका आरती चौंधे, स्नेहा कलाटे, नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे , भाजप नेते सचिन साठे तसेच शहर अभियंता प्रेरणा सिंकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, उपअभियंता निलेश दाते व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चिंचवड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बातमीसाठी संपर्क : 7350266967

