ग्राउंड रिपोर्ट

मित्रपक्षांसह विरोधकांकडून दबाव, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जनाधार अबाधित !

मुंबई : पी. बी. लोखंडे

राज्यातील सत्ताधारी महायुतीतील महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या राजकीय कोंडी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहेत. त्यांच्या काही महत्त्वाच्या योजना स्थगित किंवा बंद केल्या गेल्याने या चर्चेला अधिक जोर मिळाला आहे. आनंदाचा शिधा ही लोकप्रिय योजना रद्द केल्यानंतर आता ‘माझी शाळा सुंदर शाळा’ ही २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेली योजना बंद करण्यात आली आहे. यामुळे सरकारमधीलच मित्रपक्षाकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या राजकीय कोंडीचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत असल्‍याच्‍या चर्चा आहेत.

मुख्यमंत्री पदी असताना एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. ‘लाडकी बहीण’ ही योजना त्यापैकी एक ठरली. महिलांना आर्थिक मदत देणारी ही योजना राज्यभर लोकप्रिय ठरल्याने त्यांची प्रतिमा नागरिकांमध्ये अधिक सकारात्मक बनली. जलद निर्णयक्षमता आणि जनसंपर्क यामुळे शिंदे यांनी आपला स्वतंत्र जनाधार निर्माण केला आहे. परंतु अलीकडील काही घटनांमुळे त्यांच्या राजकीय स्थैर्यावर चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीने ठाण्यातील स्थानिक समस्या जसे की वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि पायाभूत सुविधांवरील अपयश या मुद्द्यांवरून शिंदेंना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे हे शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे विरोधकांचे हल्ले थेट त्यांच्या प्रतिमेवर परिणाम करतील का, हे पहावे लागणार आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही सहभाग घेतला आहे.

दुसरीकडे, महायुतीतील काही घटक पक्षांकडूनही त्यांच्या योजनांवर ब्रेक लावण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र शिंदे समर्थकांचा दावा आहे की या तात्पुरत्या प्रशासकीय कारणांमुळे योजना थांबवल्या गेल्या असून, त्यामागे राजकीय हेतू नाही. तथापि, या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही एकनाथ शिंदे यांचे वलय अद्यापही अभेद्य आहे. त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ आणि निर्णयक्षम वृत्ती यामुळे त्यांची लोकप्रियता टिकून आहे. शिंदे गटात नव्या कार्यकर्त्यांची भरती सुरूच असून, त्यांचा आत्मविश्वास कायम आहे. राज्याच्या राजकारणात सध्या शिंदे यांच्याविरोधातील हालचालींना जोर असला, तरी त्यांच्या प्रतिमेला फारसा धक्का बसलेला दिसत नाही.

असे असले तरी आगामी काळात ते या राजकीय कोंडीला कसे उत्तर देतात आणि मित्रपक्षांबरोबरच विरोधकांनाही कशी प्रत्युत्तरात्मक रणनीती आखतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

———————–.

बातमीसाठी संपर्क : पी. बी. लोखंडे, संपादक, पीपल बाईट.

8329525643