सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत युती-आघाडीचा पेच ?
- इच्छुकांचे वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष
सांगली ! पी. बी. लोखंडे
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गट आणि गण आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह वाढला आहे. मात्र, निवडणूक युतीतून लढवायची की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवणार, या प्रश्नावर अजूनही अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे लक्ष आता वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
महाविकास आघाडी (कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वेळी एकत्र लढण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरही या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून, आघाडीतील समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘एकजूट दाखवून सत्ता हस्तगत करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. दरम्यान, सत्ताधारी महायुतीमधील भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या पातळीवरही युतीबाबत संभ्रम कायम आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे.
जर युती-आघाडी झाली तर विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नवीन इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. उलटपक्षी, जर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला तर स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत बंडखोरीचा धोका दोन्ही आघाड्यांपुढे निर्माण होऊ शकतो. राजकीय निरीक्षकांच्या मते, सांगली जिल्ह्यातील काही प्रभागांमध्ये स्थानिक पातळीवरील मतदारसंघीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारे निर्णयच निवडणुकीचे चित्र स्पष्ट करतील. सर्वपक्षीय चर्चेनंतर पुढील आठवड्यात युती किंवा स्वतंत्र लढतीचा अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरक्षण जाहीर झाले आहे. आता आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा आम्हाला सूचना आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतात हे पाहणे महत्वाचे आहे. त्या बाबतचा निर्णय झाल्यास पुढे निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
- अभिजित पाटील, जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. सांगली.
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

