ग्राउंड रिपोर्ट

माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची यंत्रणा सक्रिय

दिवाळीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारीबाबत चाचपणी

सांगली | पी. बी. लोखंडे

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिराळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी आपली राजकीय यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय केली आहे. काही दिवस शांततेत राहिल्यानंतर आता त्यांनी संघटनबांधणी, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि उमेदवारीची प्राथमिक गणिते साधण्याचे काम सुरू केले आहे.

सध्या नाईक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दिवाळीनंतर समर्थकांसोबत बैठका घेऊन उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.गावागावातील नाईक समर्थकांना पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जात असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या मेळाव्यात या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शिराळा तालुक्यातील नव्या कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नाईक समर्थकांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, महायुतीत राहूनच लढण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. युतीतील चर्चा फलदायी न झाल्यास काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही विचारात घेतला जात आहे. आरक्षणात झालेल्या बदलामुळे काही मतदारसंघांत नवीन उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांचा प्रभाव आजही ठळक आहे. त्यांच्या समर्थकांची संघटित ताकद निवडणुकीत कोणत्या दिशेने उभी राहते, यावरच अनेक उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे नाईक यांची पुढील पावले राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहेत.

प्रतिक्रिया :

“सध्या पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकारिणी निश्चित झाली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लवकरच पदाधिकारी मेळावा घेणार आहोत. युतीमधून लढायचे की मैत्रीपूर्ण स्पर्धा घ्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतला जाईल. दिवाळीनंतर समर्थकांशी बैठक घेऊन उमेदवारी निश्चित करण्याबाबत प्रयत्न केले जाईल.”

शिवाजीराव नाईक, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महाराष्ट्र राज्य)

———————————-

बातमीसाठी संपर्क : 8329525643