ताज्या घडामोडी

खा. सुप्रिया सुळे यांनी केली नवले पुल परिसराची पाहणी

अपघातमुक्तीसाठी तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश

पुणे ! पीपल बाईट

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागांना तातडीने प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले.

नवले पूल परिसरातील तीव्र उतार, अवजड वाहनांचा वाढता वेग आणि ब्रेक फेल होण्याच्या वारंवार घटना हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण यावेळी नोंदविण्यात आले. २०२२ पासून या भागात स्पीड मीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, रंब्लर स्ट्रिप्स बसवण्यात आल्या असल्या तरी त्याची संख्या अपुरी ठरत असल्याने आता ही यंत्रणा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नऱ्हे ते रावेत एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.सुळे यांनी या संपूर्ण मार्गाचे सुरक्षा ऑडिट तातडीने करण्याचे आदेश दिले.

रस्ते सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “नागरिकांचे जीव वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून अपघात शून्यावर आणण्यासाठी दीर्घकालीन आणि तातडीची पावले उचलणे गरजेचे आहे,” असे सुळे यांनी सांगितले. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या पाहणी दरम्यान माजी नगरसेवक सचिन दोडके, स्वाती पोकळे, धनंजय बेनकर, दीपक बेलदरे, निलेश दमिष्टे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

—————–

बातमीसाठी संपर्क : 8329525643