वडगाव शेरी मतदारसंघातील विकासकामांना गती
– आमदार बापूसाहेब पठारे यांनी मांडला एक वर्षाचा आढावा
– सोशल मीडियावर मतदारांना दिली माहिती
पुणे ! पीपल बाईट
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी निवडून येऊन पूर्ण झालेल्या एका वर्षाच्या कार्याचा आढावा देत मतदारांचे आभार मानले आहेत. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मिळालेल्या लोकसमर्थनानंतर गेल्या वर्षभरात मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा आवाज विधानसभेत पोचविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली.
आमदार पठारे यांनी लोहगाव उपजिल्हा रुग्णालय, आयटीआय इमारत, लोहगाव-वाघोली रस्त्यांचे रुंदीकरण, धानोरी–चऱ्होली वन विभागातील रस्ता, पाणीपुरवठा योजना, खराडी–शिवणे रस्ता, पावसाळ्यातील पूरस्थिती आणि पुणे–नगर रोडवरील वाहतूक कोंडी अशा विविध प्रश्नांवर पाठपुरावा केल्याचे सांगितले. अनेक कामांना मंजुरी मिळाली असून काही कामे सुरू आहेत, तर उर्वरित लवकर मार्गी लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर रखडलेल्या लोहगाव विकास आराखड्याला मंजुरी मिळणे हे या वर्षातील मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. या आराखड्यामुळे गार्डन, रुंद रस्ते, शैक्षणिक संस्था, आयटी पार्क, निवासी प्रकल्प व नियोजित विकासाला गती मिळणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे–नगर रोडवरील मिसिंग लिंक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विमाननगर हयात हॉटेल–फिनिक्स मॉल ते खांदवे नगर या मार्गावर प्रस्तावित असलेला हा रस्ता सुरू झाल्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. या मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याचा उल्लेखही त्यांनी केला.निरगुडी येथे अत्याधुनिक वन उद्यान उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मिळकत करधारकांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली अभय योजना १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान लागू होणार असल्याचे सांगितले. गोरगरीब नागरिकांवरील तिप्पट शास्ती कर रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. “विकास हा माझा धर्म आणि जनसेवा हे माझे कर्तव्य,” असे सांगताना त्यांनी कोणताही पक्षीय भेद न ठेवता विकासकामांसाठी सातत्याने काम करण्याची ग्वाही दिली. “आपण ठेवलेला विश्वास तुटू देणार नाही,” अशी प्रतिज्ञाही पठारे यांनी व्यक्त केली.
——————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

