ताज्या घडामोडी

.. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

लोहगावातील खड्डेमय रस्त्यांवरून शिवसेनेचा अधिकाऱ्यांना इशारा

पुणे ! पीपल बाईट

लोहगाव परिसरातील खड्ड्यांबाबतचा प्रश्न गेल्या महिनाभरापासून अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही कोणतीच कारवाई न झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा लोहगावच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका पाणीपुरवठा कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांना त्यांच्या ‘कामगिरीबद्दल’ उपरोधिक सत्कार करण्याचा अनोखा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी हा सत्कार स्वीकारण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी साईट व्हिजिट करून येत्या पाच डिसेंबरपर्यंत डॉ. डी.वाय. पाटील कॉलेज रोडची दुरुस्ती सुरू करण्याचे आश्वासन दिले. ते न झाल्यास सहा तारखेला महापालिका कार्यालयात मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला.

या भेटीत विभाग प्रमुख सोमनाथ उर्फ बाळासाहेब वामन खांदवे, उपविभाग प्रमुख संजय मोझे, प्रभाग प्रमुख काळुराम साठे, शाखाप्रमुख निखिल खांदवे, ज्येष्ठ शिवसैनिक किसन काकडे, गोविंद मुरकुटे, युवा सेनेचे श्रीकांत खांदवे, आकाश खांदवे आदी उपस्थित होते.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील लोहगाव परिसरात पुणे महापालिकेच्या २४×७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन कामामुळे संपूर्ण भाग खड्डेमय झाला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. पाईपलाइन टाकताना ठेकेदाराने रस्ते खोदून ठेवले. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर त्यांची योग्य दुरुस्ती न करता ते तसेच सोडून दिल्याने धूळ, खड्डे आणि अस्वच्छतेचे गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. धुळीकण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले असून दुचाकीस्वारांना आणि वाहनधारकांना रस्त्यावरून जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्वरित काम सुरु करण्याची मागणी शिवसेनेने केली.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे महापालिका यांच्या मध्ये लोहगाव वासियांचे सुविधांबाबत हाल झाले आहे. काहीजण जाणूनबुजून कामे संथगतीने करून नागरिकांना त्रास देत आहेत. त्यासाठी काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे मागणी केली.

  • सोमनाथ उर्फ बाळासाहेब खांदवे, विभागप्रमुख, वडगाव शेरी.

——————————————————