अंतिम मतदार यादीसाठी २७ डिसेंबरची प्रतिक्षा
मुंबई ! पीपल बाईट
महापालिका इच्छुक उमेदवारांना आता अंतिम मतदार यादीसाठी २७ डिसेंबरची प्रतिक्षा करावी लागणार आहे. राज्यातील २५ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांशी संबंधित सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या समिती बैठकीनंतर हा सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही निश्चित करण्याची सूचना केली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, प्राथमिक मतदार यादीतील त्रुटींचे निराकरण करून तिला अद्ययावत करण्याची प्रक्रिया आता १० डिसेंबर २०२४ पासून सुरू होऊन १४ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर १९ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम मतदार यादीसाठी आवश्यक असलेली शेरा-नोट्स प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. २० रोजी यादी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध होईल. तर अंतिम केंद्रीभूत मतदार यादी २७ डिसेंबर २०२४ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध होईल.
मतदार याद्या तयार करताना काही तांत्रिक अडचणी किंवा आवश्यक कारणे असल्यास संपर्कासाठी राज्य निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांची माहिती दिली आहे. सुधारित कार्यक्रम आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, आगामी नगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी हे वेळापत्रक महत्त्वाचे मार्गदर्शन ठरणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने दिली.
——————-
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

