पुण्यात भाजपा शिवसेना युती तुटली ?
पुणे : पीपल बाईट
भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील अपेक्षित युती अखेर पुण्यात तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानिगरे यांनी याबाबत अधिकृत माहिती देत आज सर्व उमेदवारांना एबी (अधिकृत उमेदवारी) अर्ज दिले जाणार असल्याचे जाहीर केले.
काल शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, भाजपसोबत युती होण्याची शक्यता लक्षात घेता हे अर्ज तात्पुरते माघारी घेण्यात आले होते. युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा होईल, सामंजस्याचा तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठका आणि चर्चांमधून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आणि युतीबाबत सकारात्मक भूमिका समोर न आल्याने अखेर युती फिस्कटल्याचे स्पष्ट झाले.
युतीबाबत अनिश्चितता कायम राहिल्यास उमेदवारांचे नुकसान होऊ नये, प्रचाराला वेळ मिळावा आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज सर्व उमेदवारांना अधिकृत एबी अर्ज देण्यात येणार असून शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे भानिगरे यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील स्थानिक राजकारणात भाजप–शिवसेना युती तुटल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अनेक प्रभागांमध्ये थेट लढती वाढणार असून त्याचा परिणाम निवडणूक प्रचारावर आणि निकालांवर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही तासांत इतर पक्षांकडूनही रणनीती जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
—————
बातमीसाठी संपर्क : 8329525643

