करंजवडे ते डोंगरवाडी रस्त्याची दुरवस्था
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह ; देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
सांगली : प्रदीप लोखंडे
करंजवडे ते डोंगरवाडी या प्रमुख रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून वाहनचालक आणि ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या डांबरी रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचाही धाक नसल्याची वस्तुस्थिती आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरी पृष्ठभाग उखडला आहे. त्यामुळे प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे. मात्र करंजवडे ते डोंगरवाडी रस्त्याच्या बाबतीत या अटींचे पालन होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. रस्त्यालगतच्या बाजूपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ता अरुंद झाल्यासारखा भासत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

तसेच पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या भेगा तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अन्यथा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ही कामे करणे आवश्यक –
१) बाजूपट्ट्यांवरील गवत / झुडपे काढणे.
२) पावसामुळे पडलेल्या भेगांची सुधारणा करणे.
३) बाजूपट्टीवरील देखभाल दुरुस्ती करणे.
४) डांबरी पृष्ठभागावरील खड्डे भरणे.
५) रस्त्यालगतच्या गटारीची देखभाल दुरुस्ती करणे.
६) पाईप मोरीची देखभाल दुरुस्ती करणे.
७) रस्त्यालगतच्या दक्षता सूचना फलकांची देखभाल दुरुस्ती करणे.
८) पाईप मोरीच्या भिंती रंगविणे.
प्रतिक्रिया :
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार त्याबाबत तक्रारी करून उपाय योजले जात नाहीत. अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- दिलीप शेखर, माजी सरपंच प्रतिनिधी, डोंगरवाडी.
प्रतिक्रिया :
ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. दोन दिवसात त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला खड्डे बुजविण्याच्या सूचना करणार आहे. पावसाळापूर्व कामे केली जातात. त्यानुसार कामे करून घेऊ.
एस. एस. सुतार, कनिष्ठ अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना.

